पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी उद्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान, मतदान साहित्य वितरण आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
हे वाहतूक बदल 14 ते 16 जानेवारीदरम्यान लागू असणार असून, या कालावधीत सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महापालिका व वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता शहरात कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
बंद रस्ते व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे
1) हडपसर परिसर
शिवसेना चौक ते साने गुरुजी परिसरापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे. वाहनचालकांनी हडपसर वेस -अमरधाम स्मशानभूमी -माळवाडी मार्ग किंवा हडपसर गाडीतळ- संजीवनी हॉस्पिटल – डीपी रोड या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
2) कोरेगाव पार्क परिसर
नॉर्थ मेन रोड (लेन सी) ते पाणीपुरवठा केंद्र तसेच महात्मा गांधी चौक ते आझाद स्मारकाकडे जाणारे रस्ते बंद असतील. यासाठी कोरेगाव पार्क जंक्शन ते एबीसी फार्म हा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल.
3) समर्थ वाहतूक विभाग
पॉवर हाऊस चौक ते बॅनर्जी चौक, संत कबीर चौक ते क्वार्टरगेट आणि रामोशी गेट ते जुना मोटार स्टँड हे मार्ग बंद राहतील. प्रवाशांनी शांताई हॉटेल- क्वार्टरगेट – बाहुबली चौक -सेव्हन लव्हज चौक या मार्गे प्रवास करावा.
4) विमानतळ परिसर
फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता तसेच निको गार्डन परिसरातील रस्ते बंद राहतील. वाहतूक विमाननगर चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक किंवा दत्त मंदिर चौक मार्गे वळवण्यात येणार आहे.
5) विश्रामबाग विभाग (मध्यवर्ती पुणे)
पूरम चौक ते टिळक चौक आणि अलका टॉकीज ते पूरम चौक हे रस्ते पूर्णतः बंद राहतील. नागरिकांनी बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता किंवा दांडेकर पुलाचा वापर करावा.
6) दत्तवाडी विभाग
सणस पुतळा ते ना. सी. फडके चौक तसेच सारसबाग खाऊ गल्ली परिसर वाहतुकीस बंद राहील. येथील वाहतूक एबीसी चौक आणि पूरम चौक मार्गे वळवण्यात आली आहे.
नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि अनावश्यक त्रास टाळण्यासाठी प्रवासाची योग्य पूर्वतयारी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


