Solapur Crime: मुंबई-सोलापूर धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका महिला टोळीचा कट रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) उधळून लावला आहे. कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरपीएफच्या विशेष पथकाने धाराशिव जिल्ह्यातील नऊ महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. या धाडसी कारवाईमुळे रेल्वे प्रवासादरम्यान होणारी मोठी लूट टळली असून प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कुर्डूवाडी स्थानकावर अशी झाली कारवाई
बुधवारी कुर्डूवाडी स्थानकावर आरपीएफच्या CPDS (CPDS) पथकाचे जवान गस्त घालत असताना त्यांना काही महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सिद्धेश्वर एक्सप्रेस येताच या महिला दरोडा टाकण्याच्या उद्देशाने डब्यांच्या आसपास दबा धरून होत्या. मात्र, पथकाने चपळाई दाखवत घेराव घालून नऊही महिलांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत या महिला रेल्वेमध्ये मोठी चोरी करण्याच्या इराद्याने आल्याचे स्पष्ट झाले.
टोळीचे ‘धाराशिव’ कनेक्शन आणि गुन्हेगारी इतिहास
अटक करण्यात आलेल्या सर्व महिला धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. धक्कादायक म्हणजे यातील अनेक महिलांवर यापूर्वी देखील रेल्वेमध्ये चोरी, पाकीटमारी आणि लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. ही टोळी केवळ सोलापूर विभागातच नव्हे, तर पुणे आणि मुंबई विभागातील रेल्वे गाड्यांमध्येही सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे.
पुढील तपास लोहमार्ग पोलिसांकडे
आरपीएफने या महिलांना अटक केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) ताब्यात दिले आहे. ही टोळी चालवणारा मुख्य सूत्रधार कोण आहे? चोरीचे सोने किंवा मुद्देमाल त्या कुठे विल्हेवाट लावतात? या टोळीमध्ये आणखी किती सदस्य आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस आता त्यांची सखोल चौकशी करत आहेत.
प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवासादरम्यान दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.


