Konkan Politics: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच कोकण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार गट) मोठी पडझड झाली आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रामाणिकपणाला किंमत उरली नाही; कदमांनी व्यक्त केली खंत
१९८४ पासून शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश कदम यांनी पक्षात आपल्याला एकाकी पाडले गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. संकटकाळात मी पक्षासाठी कोकणात पाय रोवून उभा राहिलो, पण जेव्हा मला पक्षाच्या पाठबळाची गरज होती (नगराध्यक्ष निवडणूक), तेव्हा मला वाऱ्यावर सोडण्यात आले, असा आरोप कदमांनी केला. जिथे आपली गरज नाही तिथे राहण्यात अर्थ नाही, असे सांगत त्यांनी सध्याच्या राजकारणात निष्ठेपेक्षा अन्य गोष्टींना महत्त्व दिले जात असल्याची खंत व्यक्त केली.
कोकणच्या राजकारणात भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. मात्र, अलीकडच्या नगर परिषद निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी मतभेद बाजूला सारून एकत्र काम केले होते. तरीही, अंतर्गत राजकारण आणि दुर्लक्षामुळे कदम यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
निवडणुकीवर काय परिणाम होणार?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असतानाच कदमांसारख्या ज्येष्ठ नेत्याने पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कोकणातील बालेकिल्ल्याला तडे जाण्याची शक्यता आहे. रमेश कदम आता कोणती राजकीय दिशा पकडणार, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.


