Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे. लोकसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी एनडीएकडून व्यापक रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर येत असून त्याचा फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा एकदा फूट पडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभेत आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एनडीए विविध प्रादेशिक पक्षांतील खासदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदारांबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
सध्या लोकसभेत ठाकरे गटाचे ९ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार सदस्यत्व अबाधित ठेवण्यासाठी दोन-तृतीयांश म्हणजे किमान सहा खासदारांचा गट दुसऱ्या पक्षात विलीन होणे आवश्यक असते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा संभाव्य पर्याय मानला जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांत ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेअंतर्गत ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, महायुतीच्या विजयामुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मात्र, या सर्व चर्चांबाबत ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कोणती राजकीय घडामोड घडते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


