Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासगी रुग्णालयांना महत्त्वाचा इशारा देत रुग्णांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्यास सक्ती करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश FDA कडून जारी करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, राज्यभरातील अनेक खासगी रुग्णालयांविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी FDA कडे सातत्याने येत होत्या. काही रुग्णालयांकडून रुग्णांना त्यांच्या अंतर्गत औषध विक्री केंद्रातूनच औषधे खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, औषधे कुठून खरेदी करायची हा पूर्णपणे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये स्वतःची फार्मसी असते. मात्र अनेकदा या फार्मसींमधील औषधांचे दर बाहेरील मेडिकल स्टोअर्सपेक्षा जास्त असल्याच्या तक्रारी समोर येत असतात. काही ठिकाणी जेनेरिक औषधे कमी किमतीत उपलब्ध असूनही रुग्णांना ती खरेदी करण्यास अडथळे निर्माण केले जात असल्याचेही आढळून आले आहे.
नवीन आदेशानुसार, डॉक्टरांनी रुग्णांचे प्रिस्क्रिप्शन रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असेल. तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


