Pune News : एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत देशभरातील सुमारे ४० विद्यार्थ्यांची फसवणूक करून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आदित्यकुमार उर्फ अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा तेलंगणातील आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने बनावट शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र आणि कंपनी स्थापन करून विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाचे ‘गॅरंटीड’ आश्वासन दिले होते. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी ५ लाख रुपये, तर खासगी कॉलेजसाठी ३ लाख रुपये ‘काउन्सेलिंग फी’च्या नावाखाली तो वसूल करत होता.
या प्रकरणाची सुरुवात पुण्यातील एका पालकाने दिलेल्या तक्रारीतून झाली. त्यांच्या ८.२५ लाख रुपयांच्या फसवणुकीनंतर तपास सुरू झाला आणि त्यातून संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. तपासात आरोपीने पुणे, मुंबईसह अनेक शहरांतील पालकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.
आरोपीविरुद्ध मुंबई आणि हैदराबाद येथे आधीच सहा फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो यापूर्वी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पुणे पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले असून संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू आहे.


