Washim family death case : वाशिम जिल्ह्यातील तिवळी गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संतोष बकाल (३५) यांनी पत्नी इंद्रायणी बकाल (२८), मुलगी जान्हवी (७) आणि मुलगा सोहम (५) यांना विहिरीत फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांनीही महावितरणच्या वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इंद्रायणी आणि दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर जैन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी हा प्रकार केवळ आत्महत्येचा नसून घातपात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. इंद्रायणी यांचे भाऊ सुधाकर इंगोले यांनी संपत्तीच्या वादातून संतोष बकाल यांचा त्यांच्या भावासोबत वारंवार वाद होत असल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मात्र, पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष काढण्यास नकार दिला असून शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि इतर पुराव्यांच्या आधारेच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे या चार मृत्यूंचे गूढ नेमके काय, याकडे संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.


