BMC Mayor Election : मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीवरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि भाजप यांच्यात मुंबई महापौरपदाबाबत बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेने महापौरपदासाठी अडीच वर्षांची मागणी करत भाजपवर दबाव टाकला होता. मात्र, अशाच वेळी ठाकरे गट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरू झाल्याचे वृत्त समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. भाजप सत्ता स्थापन करत असल्यास, ठाकरे गटाकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महापौर निवडणुकीदरम्यान ठाकरे गटाचे नगरसेवक मतदान प्रक्रियेत गैरहजर राहू शकतात, अशी रणनीती ठरवण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. शिंदे आणि भाजप यांच्यातील चर्चा सुरू असतानाच हा नवा राजकीय ट्विस्ट समोर आल्याने शिंदे गटाची कोंडी झाल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, २०१७ च्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपने माघार घेत ठाकरेंचा महापौर बसवला होता. तीच रणनीती यावेळी उलट पद्धतीने वापरली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. म्हणजेच, २०१७ ची ‘परतफेड’ ठाकरे गट करणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सध्याच्या स्थितीत मुंबई महापालिकेतील बहुमत महायुतीच्या पारड्यात असले तरी, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटानेही चांगली कामगिरी केली आहे. मात्र, महापौरपदावरून सुरू असलेल्या या घडामोडींमुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.


