मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, अनेक महापालिकांमध्ये महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. मुंबईतही भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युतीत ही निवडणूक लढवली होती. भाजपचे ८९ तर शिंदे गटाचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत.
पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौरपदासाठी अडीच वर्षांची अट ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच कारणामुळे शिंदे गटाने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना ताज लँड हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ‘आमचाच महापौर व्हावा ही आमची आजही इच्छा आहे’ असा दावा केला आहे. मात्र, याच वेळी ठाकरे गटासाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे काही नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. बहुमत असूनही विरोधी बाकावर बसण्याची नगरसेवकांची तयारी नसल्याने, ते शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सध्या संबंधित नगरसेवकांचे फोन बंद असल्याने संशय अधिक बळावला आहे.
महापौरपदाच्या राजकारणात ठाकरे गटाचे नगरसेवक थेट शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं चित्र निर्माण होत असून, यामुळे उद्धव ठाकरे यांना हा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मुंबई महापालिकेच्या सत्तास्थापनेचा संघर्ष आता अधिकच रंगतदार होताना दिसत आहे.


