पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी थंडी कमी झाली असली, तरी आता भारतीय हवामान विभागाने (IMD) थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात थंडी पुन्हा जोर धरू शकते, विशेषतः विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात याचा मोठा परिणाम जाणवणार आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात ४ अंशांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवणार आहे. सध्या सकाळ-रात्री थंडी आणि दुपारी उकाडा असा विरोधाभास पाहायला मिळतोय.
कुठे किती तापमान?
- धुळे: 9 अंश (राज्यातील सर्वात कमी तापमान)
- गोंदिया: 9.8 अंश
- यवतमाळ, परभणी: 10 अंश
मराठवाड्यात सध्या किमान तापमानात थोडी वाढ दिसेल, मात्र त्यानंतर थंडी पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. यंदा मराठवाड्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली होती आणि गायब झालेली थंडी पुन्हा सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट आहे.
आरोग्यावर थेट परिणाम
सकाळी-रात्री थंडी आणि दुपारी उष्णता यामुळे सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलांसोबत वायू प्रदूषणही झपाट्याने वाढत असून श्वसनविकारांचा धोका अधिक वाढला आहे. नागरिकांनी विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात काय स्थिती?
पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून, हवामान स्थिर राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा इशारा
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागात पावसाची शक्यता आहे. वायू प्रदूषणाने त्रस्त असलेल्या दिल्लीत पावसामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.


