पाबळ : जिल्हा परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच पाबळ-केंदूर गटातील राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच आघाडी घेत तिन्ही जागांवरील उमेदवार निश्चित केल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांना पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटाची उमेदवारी देण्यात आली आहे. उज्जैन महाकाल यात्रेसाठी तब्बल २१ हजार भाविकांचे आयोजन केल्यामुळे शिवले यांची मतदारसंघात मोठी ओळख आहे. त्याचबरोबर पाबळ गणासाठी माजी सभापती प्रकाश पवार यांच्या पत्नी वंदना पवार, तर केंदूर गणासाठी माजी खासदार स्व. बापूसाहेब थिटे यांच्या नातसून सुचेता थिटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार प्रचारात सक्रिय झाले असताना, भाजप मात्र अद्याप उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतच अडकलेला आहे. निवडणूक तरी लढवता यावी, यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे यांनी पुढाकार घेत उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य उमेदवार न मिळाल्याने त्यांनी हिवरे या एकाच गावातील दोन माजी सरपंचांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला.
यानुसार विकासनाना गायकवाड यांना जिल्हा परिषद गटासाठी, तर दीपक खैरे यांना पाबळ गणातील पंचायत समितीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जयश्री पलांडे यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मोठ्या गावांना डावलून पलांडेंचा हिवऱ्याचा आग्रह का ?
दरम्यान, पाबळ, केंदूर, करंदी, जातेगाव बुद्रुक, मुखई ही या गटातील मोठी आणि प्रभावी गावे असताना, ती डावलून हिवरेसारख्या छोट्या गावातील दोन उमेदवार निवडणे हा निर्णय भाजपमधीलच अनेकांना खटकत आहे. काही नाराज पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पलांडे यांनी स्वतः उमेदवारी न घेता राष्ट्रवादीतील दोन माजी सरपंचांना भाजपकडून उमेदवारी देणे हा पक्षासाठी अडचणीचा निर्णय ठरू शकतो. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणीही भाजपातील नाराजांकडून होत आहे.


