Rupali Thombare: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर सोशल मीडियावर होत असलेल्या वैयक्तिक टीकेला आणि ‘फेक नरेटिव्ह’ला त्यांनी पूर्णविराम देण्याचे ठरवले असून, ट्रोलर्सना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. पुणे महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक २५ आणि २६ मधून निवडणूक लढवणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांचाही यामध्ये समावेश आहे. पराभवानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंट्स व्हायरल होत होत्या, या पार्श्वभूमीवर त्यांनी आता कठोर पावले उचलली आहेत.
अश्लील कमेंट केल्या तर कारवाईला सामोर जावं लागणार
सोशल मीडियाच्या माध्यमातून इशारा देताना रुपाली पाटील म्हणाल्या की, “माझ्या विरोधात हेतुपुरस्सर चुकीची माहिती पसरवणे, अश्लील कमेंट करणे किंवा बदनामीकारक पोस्ट करणे थांबवावे. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून कोणाचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्यास, मी आणि माझी सोशल मीडिया टीम त्याला जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, चुकीच्या पोस्ट करणाऱ्यांवर कडक गुन्हे दाखल केले जातील. ट्रोल करणारा व्यक्ती कोणत्याही पक्षाचा, जातीचा किंवा धर्माचा असला तरी कायद्यानुसार कारवाई होईल. त्यांनी मत मांडताना सांगितले की वैचारिक मतभेद असू शकतात, पण पोस्ट करण्यापूर्वी माहितीची खात्री करा. “नो फेक नरेटिव्ह, नो बदनामी, नो अश्लील कमेंट्स! या पोस्टलाच माझी अंतिम ताकीद आणि जाहीर नोटीस समजावे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान रुपाली पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आक्षेप नोंदवले होते. त्यावेळेस झालेल्या गोंधळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यावरून त्यांना ट्रोल केले जात होते. मात्र, आता या ट्रोलिंगचा स्तर घसरल्याने त्यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.


