High speed train crash Spain : स्पेनमध्ये घडलेल्या एका भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. दक्षिण स्पेनमधील कॉर्डोबा शहराजवळील अदमुझ परिसरात दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक झाली असून, या दुर्घटनेत २१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालागाहून माद्रिदकडे जाणारी खासगी आयरियो कंपनीची हाय-स्पीड ट्रेन अचानक रुळावरून घसरली आणि दुसऱ्या मार्गावर गेली. त्याच वेळी माद्रिदहून हुएल्वाकडे जाणारी सरकारी रेन्फे कंपनीची ट्रेन त्या रुळावरून येत होती. दोन्ही ट्रेनची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात सुमारे ७० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील ३० जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती स्पेनचे वाहतूक मंत्री ऑस्कर पुएंटे यांनी दिली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बचावकार्य अद्याप सुरू आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, मालागाहून ट्रेन निघाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत हा अपघात झाला. विशेष म्हणजे, ज्या रुळावरून ट्रेन घसरली, त्या रुळांचे मे २०२५ मध्ये नूतनीकरण करण्यात आले होते, त्यामुळे अपघाताच्या कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अपघातग्रस्त आयरियो ट्रेनमध्ये सुमारे ३०० प्रवासी, तर रेन्फेच्या ट्रेनमध्ये १०० प्रवासी प्रवास करत होते. धडकेनंतर दोन्ही ट्रेनचे डबे रुळावरून खाली घसरले असून, परिसरात भीषण दृश्य निर्माण झाले होते.
या दुर्घटनेनंतर माद्रिद आणि अंडालुसिया दरम्यानची रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तसेच, मृत आणि जखमी प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी आपत्कालीन मदत व समुपदेशन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अपघात नेमका कसा झाला, याचा सखोल तपास स्पेन प्रशासनाकडून सुरू आहे.


