Loni Kalbhor Accident: खेळण्याच्या वयात एका निष्पाप बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना पुण्यात घडली आहे. लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित सोसायटीमध्ये सायकल खेळणाऱ्या पाच वर्षांच्या मुलाला कारने धडक दिली, ज्यात या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
खेळता खेळता काळ आला…
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास निष्कर्ष आश्वत स्वामी (वय ५) हा त्याच्या आजीसोबत ‘जॉय नेस्ट’ सोसायटीच्या आवारात आला होता. निष्कर्ष आपल्या सायकलवर पार्किंगमध्ये खेळत असतानाच अचानक समोरून एक कार आली. कारचा वेग कमी होता, मात्र तरीही चालकाला सायकलवर असलेला लहानगा निष्कर्ष न दिसल्याने कारची त्याला जोरदार धडक बसली. या धडकेत निष्कर्ष गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
सोसायटीच्या सुरक्षित आवारात आपल्या आजीच्या देखरेखीखाली खेळत असताना एका पाच वर्षांच्या निष्पाप बालकावर काळाचा घाला
लोणी काळभोर परिसरातील जॉय नेस्ट सोसायटीमधील घटना #Punenews #Viralvideo #marathinews #म pic.twitter.com/nAEOKGeEIy— Harish Malusare (@harish_malusare) January 23, 2026
हेही वाचा – Pune Crime: पुण्यात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; पोलीस हवालदारच निघाला ड्रग रॅकेटचा सूत्रधार
वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणी निष्कर्षचे वडील आश्वत नारायण स्वामी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी संबंधित कार चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे स्वामी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


