Oshiwara Firing Case: अंधेरीतील गजबजलेल्या ओशिवारा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता अनपेक्षित वळण मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बॉलिवूडचा वादग्रस्त अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान (KRK) याला मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
१८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोखंडवाला परिसरातील ‘नालंदा’ इमारतीच्या दिशेने गोळीबार झाला होता. एका मॉडेल आणि लेखकाच्या घराला लक्ष्य करून ही गोळी झाडण्यात आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एकेकाळी अंडरवर्ल्डचा गड मानल्या जाणाऱ्या या भागात पुन्हा गोळी सुटल्याने पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली.
तपासाची चक्रे फिरली आणि ‘ट्विस्ट’ आला
सुरुवातीला हा प्रकार व्यावसायिक वैमनस्यातून झाला असावा असा संशय होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाअंती पोलिसांना चित्रपट क्षेत्राशी संबंधित धागेदोरे मिळाले. या आधारे पोलिसांनी आपला मोर्चा केआरकेकडे वळवला आणि काल रात्री त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
केआरकेचा अजब दावा: “फक्त पिस्तूल तपासायचे होते”
पोलिसी खाक्या दाखवताच केआरकेने या घटनेमागचे जे कारण सांगितले, ते ऐकून अधिकारीही चक्रावून गेले. केआरकेच्या दाव्यानुसार, तो आपल्या परवानाधारक पिस्तुलाची साफसफाई करत होता. पिस्तूल व्यवस्थित चालते की नाही, हे पाहण्यासाठी त्याने खिडकीतून मोकळ्या जागेच्या (खारफुटी) दिशेने गोळी झाडली. वाऱ्याच्या वेगामुळे गोळीची दिशा बदलली आणि ती समोरच्या ‘नालंदा’ इमारतीला जाऊन लागली. कोणालाही इजा करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असा बचाव त्याने केला आहे.
पुढील कारवाई काय?
केआरकेचे हे स्पष्टीकरण पोलीस सत्य मानण्यास तयार नसून, यामागे नेमका काय हेतू होता याचा कसून शोध घेतला जात आहे. रहिवासी भागात अशा प्रकारे बेजबाबदारपणे गोळीबार करणे हा गंभीर गुन्हा असल्याने, आता केआरकेच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिकृत खुलासा पोलीस लवकरच करणार आहेत. सोशल मीडियावर या अटकेनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून बॉलिवूडमध्ये मात्र पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.


