मुंबई : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सकाळी सकाळी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार लवकरच महाविकास आघाडीत येतील, असा थेट दावा राऊत यांनी केला आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये राज्यभरात अनेक अनपेक्षित युती-आघाड्या पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गट एकत्र लढले, तर तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूही एका व्यासपीठावर आले. याच निवडणुकांमध्ये पुणे, पिंपरीसह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी एकत्र निवडणूक लढवली, यामुळे राजकीय समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळाले.
शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. मात्र यावर थेट उत्तर देण्याऐवजी राऊतांनी उलट सवाल केला. “शरद पवार बाहेर जातील असं का वाटतं? अजित पवारच शरद पवारांसह महाविकास आघाडीत येतील, असा विचार का करत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राऊत पुढे म्हणाले की, अजित पवारांचं मन कुटुंबाकडे आहे, त्यामुळे भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडीत एकत्र दिसतील. “अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत येईल,” असं भाकीतही त्यांनी केलं.
“दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही”
अजित पवार सध्या महायुतीत असले तरी महाविकास आघाडीसोबत त्यांचा पाट लावलेला आहे, असं राऊत म्हणाले. “दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही. काहीतरी एक सोडावंच लागतं. अजितदादांना बाहेर पडावं लागेल,” असा टोला त्यांनी लगावला.
“मेलं मेंढरू आगीला भीत नाही”
सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स पुन्हा उघडण्याच्या भाजपच्या इशाऱ्यांवर प्रतिक्रिया देताना राऊतांनी एक वाक्यात उत्तर दिलं. “मेलं मेंढरू आगीला भीत नाही,” असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “तुम्हीच अजित पवारांना क्लीनचिट दिली. पंतप्रधान मोदींनी गर्जना केल्यानंतरही त्यांना सरकारमध्ये घेतलं. मग आता कोणत्या तोंडाने धमक्या देता?” असा सवालही राऊतांनी केला.
“सत्ता असेपर्यंत भाजपसोबत, सत्ता गेल्यावर आमच्यासोबत”
छगन भुजबळांच्या प्रकरणाचा उल्लेख करताना राऊत म्हणाले, “भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात होते, आम्हीही होतो. ते सर्व प्रकरणांत निर्दोष ठरले. जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे, तोपर्यंत लोक भाजपसोबत राहतात. सत्ता बदलली की मनाने, तनाने, धनाने ते आमच्यासोबत येतात.”


