Maharashtra Weather : राज्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून, त्यामुळे थंडीची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे जाणवत आहे. मात्र हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत पुन्हा थंडीला पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून पुढील 12 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. तापमानात चढ-उतार होत असल्याने काही भागांत गारवा सौम्य तर काही ठिकाणी पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण
कोकण विभागात बहुतांश ठिकाणी हवामान निरभ्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईतही दिवसभर आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी सौम्य गारवा जाणवेल, तर दुपारनंतर उष्णतेचा अनुभव येऊ शकतो.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात सकाळी आकाश निरभ्र राहील, तर दुपारी किंवा सायंकाळी काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसून येऊ शकते. सकाळी गारवा आणि दुपारी उष्णतेची जाणीव होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात हवामान प्रामुख्याने स्वच्छ राहील, असा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरसह इतर भागांत दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून ढगाळ वातावरण कमी झाल्याने उष्णतेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
विदर्भ
विदर्भात काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. नागपुरातही ढगाळ वातावरण जाणवू शकते. सकाळी आणि रात्री थोडा गारवा तर दिवसा उष्णतेत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


