मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. योजनेशी संबंधित तक्रारी, शंका आणि अडचणी दूर करण्यासाठी 181 हा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींनी कोणतीही अडचण असल्यास या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थी महिलांकडून चुकून चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांचा लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा तक्रारींसह योजनेशी संबंधित इतर सर्व प्रश्नांचे फोनवरूनच निरसन करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईनवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या हेल्पलाईनसाठी कॉल ऑपरेटर्सना आवश्यक ते विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, लाभार्थी महिलांच्या सर्व तक्रारी आणि शंकांचे निरसन 181 या क्रमांकावरून करण्यात येणार असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गरज भासल्यास महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी
महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही महिलांकडून e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे, योजनेच्या निकषांनुसार अशा लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.
हप्त्यांवरून महिलांचा आक्रोश
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 चा प्रत्येकी 1500 रुपयांचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे विदर्भातील भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांत महिलांनी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले होते.
नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर अखेरीस व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला, तर डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या सुमारास लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


