Sinhgad Institute Crisis : पुणे शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल सोळा महिन्यांपासून वेतन थकले असून, या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे संस्थेतील शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 16 महिन्यांपासून संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळालेले नाही. पगारासाठी वारंवार पाठपुरावा करूनही व्यवस्थापनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला असून, दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे.
दरम्यान, अनुभवी शिक्षक नोकरी सोडून जात असल्याने त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. मात्र, त्यांनाही वेळेवर वेतन मिळत नसल्याची तक्रार समोर येत आहे. या परिस्थितीमुळे अध्यापनाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. प्रशासनाने त्वरित पगार अदा न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
गेल्यावर्षी कार्यालय झाले होते सील
दरम्यान, गेल्यावर्षी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मिळकत कराच्या थकबाकीमुळे महापालिकेने वडगाव बुद्रुक येथील 43 आणि कोंढवा येथील 6 मिळकती सील केल्या होत्या. संस्थेच्या शहरातील एकूण 128 मिळकतींचा तब्बल 345.43 कोटी रुपयांचा मिळकत कर थकला असल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये एरंडवणा येथील मुख्य कार्यालयाचाही समावेश असून, 47.43 कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी हे कार्यालय सील करण्यात आले होते. महापालिका आणि संस्थेदरम्यान करासंदर्भात न्यायालयीन वाद सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.


