सोलापूर : राजकारणात काहीही घडू शकते, याची पुन्हा एकदा प्रचिती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, राज्यभरात एकमेकांविरोधात उभे असलेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट हे चारही पक्ष बार्शी तालुक्यात भाजपविरोधात एकत्र आले आहेत. या अनपेक्षित राजकीय घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपला रोखण्यासाठी या चारही पक्षांनी महाआघाडी स्थापन केली असून, या आघाडीची अधिकृत घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे केली आहे. त्यांनी आज सायंकाळी चार वाजता बार्शी येथे होणाऱ्या निर्धारण मेळाव्याला कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
बार्शी तालुक्यातील राजकारण हे पारंपरिकरित्या आमदार दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन नेत्यांभोवती फिरत आले आहे. पक्ष कोणताही असो, निवडणूक लढत प्रामुख्याने या दोन गटांमध्येच रंगताना दिसते. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी विरुद्ध राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजप असा थेट सामना होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, राज्यपातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही शिवसेना गट आणि दोन्ही राष्ट्रवादी गट एकाच व्यासपीठावर येणे ही बार्शीच्या राजकारणातील अत्यंत मोठी आणि अनपेक्षित घडामोड मानली जात आहे. या आघाडीमुळे जिल्हा परिषद निवडणूक अधिकच चुरशीची आणि लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
आज होणाऱ्या निर्धारण मेळाव्यात महाआघाडीची निवडणूक रणनीती, उमेदवार निवड, प्रचाराची दिशा आणि भाजपविरोधातील पुढील राजकीय भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


