Dnyaneshwar Ghodekar : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) घोडेकर यांनी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवीदास दरेकर उपस्थित होते.
घोडेकर यांच्या अचानक झालेल्या पक्षप्रवेशामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या प्रवेशाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. घोडेकर यांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आंबेगाव तालुक्यात मोठी ताकद मिळणार असल्याचे चित्र आहे.
ज्ञानेश्वर घोडेकर हे घोडेगाव परिसरातील माळी समाजाचे ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी खरेदी-विक्री संघावर संचालक तसेच अध्यक्ष म्हणून काम केले आहे. याशिवाय घोडेगाव ग्रामपंचायतीत त्यांनी सलग दहा वर्षे सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि मजबूत जनसंपर्काचा फायदा शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
घोडेकर हे महात्मा फुले ग्रामीण पतसंस्थेचे माजी अध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे माळी समाजाचे मतदान शिवसेनेकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाप्रमुख देवीदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.
ज्ञानेश्वर घोडेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी बोलताना घोडेकर यांनी विकासकामांना गती देण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.


