Unseasonal rain in Maharashtra today : महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावत निसर्गाचा लहरीपणा दाखवून दिला आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या आहेत. ठाणे, रायगड आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पावसामुळे वातावरण बदललं असून, ढगाळ हवामानामुळे थंडीचा कडाका पूर्णपणे ओसरला आहे.
मुंबई, पुणे आणि उपनगरांमध्ये सकाळपासून आकाश ढगांनी भरलेलं असून हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी गायब झाली असून, कधीही पावसाचा शिडकाव होईल अशा स्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. याचा थेट परिणाम राज्याच्या हवामानावर झाला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. पुढील २४ तास राज्यात असंच ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ भागातअवकाळी सरी
रायगड जिल्ह्यात पहाटे चारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पेण तालुक्यातील जोहे आणि हमरापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे पेणमधील गणपती मूर्ती कारखाने आणि वीटभट्ट्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कच्च्या मूर्ती आणि भाजणीस ठेवलेल्या विटा खराब होण्याचा धोका वाढला आहे.
ठाणे शहरातही घोडबंदर रोडसह आसपासच्या परिसरात पावसाचा शिडकाव झाला. ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवल्याने ठाणेकर आश्चर्यचकित झाले आहेत.
नंदुरबारात शेतकरी संकटात
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. शहादा शहरात जोरदार पाऊस झाला, तर जिल्ह्यातील अनेक भागांत हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
विशेषतः गहू आणि पपई पिकांना सर्वाधिक धोका निर्माण झाला असून, सातपुड्याच्या डोंगराळ भागातील आंबा आणि कैरी उत्पादनावरही संकट आलं आहे. पावसामुळे मोहोर गळून पडल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. हाताशी आलेलं पीक धोक्यात आल्याने बळीराजा आर्थिक चिंतेत सापडला आहे. एकूणच, अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामान पूर्णपणे बदललं असून नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


