Deadly winter storm in America kills 25 people : अमेरिकेत गेल्या काही दशकांतील सर्वात भीषण हिमवादळाने (Winter Storm) थैमान घातलं आहे. ‘बॉम्ब सायक्लोन’मुळे निर्माण झालेल्या या प्रचंड वादळात आतापर्यंत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. न्यूयॉर्कपासून टेक्सासपर्यंत संपूर्ण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
प्रचंड हिमवृष्टी आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक प्रमुख महामार्ग बंद करण्यात आले असून हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काही भागांमध्ये तापमान उणे २५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने नागरिकांना जीवघेण्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
या हिमवादळाचा मोठा फटका वीजपुरवठ्यावरही बसला आहे. साडेसात लाखांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून लाखो नागरिक अंधारात आणि कडाक्याच्या थंडीत रात्र काढत आहेत. प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर करत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस परिस्थिती गंभीरच राहण्याची शक्यता असून, थंडीची लाट आणि बर्फवृष्टीमुळे आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


