Ajit Pawar Funeral: राज्याच्या राजकारणातील एक झंझावात आज कायमचा शांत झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून, आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बुधवारी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात ‘दादांची’ प्राणज्योत मालवली आणि एका धडाडीच्या नेतृत्वाचा करुण अंत झाला. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
काटेवाडीत जनसागराचा भावनांचा बांध फुटला
आज सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून अजितदादांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. ज्या घरात दादांनी आपला सर्वाधिक काळ व्यतीत केला आणि सर्व सण-उत्सव जनतेच्या साक्षीनं साजरे केले, त्याच घरातून आज त्यांची अंत्ययात्रा निघाली. पार्थिव अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानकडे नेण्याकरिता जेव्हा रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले, तेव्हा उपस्थित जनसागराचा भावनांचा बांध फुटला. “आमच्या दादांना नका नेऊ… पाया पडतो तुमच्या, थांबा ना!” अशा आर्त विनवण्या करत हजारो कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी काटेवाडीतील महिलांनाही आपले अश्रू अनावर झाले होते. “आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता,” अशा शब्दांत आपल्या लाडक्या नेत्याला महिलांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
अजित पवार यांचे पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवण्यात आले असून, सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. या दुःखद प्रसंगी राज्यभरातील दिग्गज राजकीय नेत्यांची मांदियाळी बारामतीत दाखल झाली आहे. प्रशासनावर कमालीची पकड असलेला आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा एक कणखर नेता हरपल्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. नियतीने केलेल्या या भीषण आघातामुळे बारामतीवर आज दुःखाचा डोंगर कोसळला असून, आपल्या लाडक्या ‘दादांना’ शेवटचा निरोप देण्यासाठी जनसमुदायाचा महासागर उसळला आहे.


