Maharashtra Politics : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बडे नेते भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.
लातूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “राष्ट्रवादीचे तीन बडे नेते जरी पक्षात असले, तरी ते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात. कारण या तिघांच्या ईडीच्या फाईल भाजपकडे अडकल्या आहेत.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी याला “भाजपचा मोठा डाव” असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “आज झालेल्या शपथविधीमुळे अजितदादांबद्दल निर्माण झालेली सहानुभूती मागे पडताना दिसते आहे. अंत्यसंस्काराला चार दिवसही झाले नाहीत. अशा वेळी पुष्पगुच्छ घेऊन जायचं की सांत्वन करायला जायचं, हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.”
तथापि, त्यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छाही दिल्या. “या दुःखाच्या काळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं हे धाडसाचं पाऊल आहे. या धाडसाच्या बळावर त्यांनी सामान्य माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आणि त्यानंतरच शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार यांच्या निधनानंतर बच्चू कडू यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली वाहिली होती. “अजितदादांचे अचानक निधन ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. धाडसी, स्पष्टवक्ते, कामासाठी झपाटलेले आणि कार्यकर्त्यांसाठी कायम धावणारे नेतृत्व राज्याने गमावले,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.


