Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला असून, बलुचिस्तान प्रांतातील बंडखोरांनी तब्बल 14 शहरांमध्ये एकाचवेळी हल्ले करत देशाला हादरवून सोडले आहे. या भीषण हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सुरक्षा दलांचे जवान, पोलिस आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे.
बलुचिस्तानमध्ये सशस्त्र बलुच बंडखोरांनी 14 वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, बॉम्बस्फोट आणि आत्मघातकी हल्ले केले. सुरक्षा दल, पोलिस ठाणे, प्रशासकीय इमारती आणि नागरी वस्ती या हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य होते. या हल्ल्यांना पाकिस्तानी लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून, चकमकीत 92 बंडखोर ठार झाल्याची माहिती आहे.
क्वेटा, ग्वादर, मास्टुंग, नुश्की, दलबंदिन, पंजगुर, तुम्प, पासनीसह अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार पसरला. या हल्ल्यांची जबाबदारी बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने स्वीकारली आहे.
भारतावर आरोप, भारताकडून फेटाळणी
या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सुरक्षा दलांचे कौतुक करत दहशतवादाविरोधातील लढा सुरूच राहील, असे स्पष्ट केले. पाकिस्तानी लष्कराने या हल्ल्यांना देशाबाहेरून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप केला असून, अप्रत्यक्षपणे भारताकडे बोट दाखवले आहे. मात्र, भारताने हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.
अपहरण, कैद्यांची सुटका आणि शस्त्रलूट
बंडखोरांनी बलुचिस्तानमधील 9 जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. एका उपजिल्हा आयुक्तासह 18 पोलिसांचे अपहरण करण्यात आले असून, तुरुंगातून 30 कैद्यांची सुटका केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा लुटण्यात आल्याची माहिती आहे.
बलुचिस्तान सरकारची प्रतिक्रिया
बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले की, क्वेटा, ग्वादर, मकरन, हब, चमन, नसीराबाद आणि नुश्की या भागांमध्ये हल्ले झाले. नागरिकांच्या जीवितहानीबाबतची आकडेवारी अद्याप स्पष्ट नाही. मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी पोलिस चौक्या आणि फ्रंटियर कॉर्प्सच्या तळांना लक्ष्य केले होते, मात्र सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे अनेक हल्ले उधळून लावण्यात आले.


