Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्रासाठी मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून, यामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि आधुनिक होणार आहे.
निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत असून, संसदेत अर्थसंकल्पाचे वाचन सुरू आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व खासदार सभागृहात उपस्थित आहेत.
पुढील 5 वर्षांत 20 नवे जलमार्ग
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर मोठा भर देण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत देशभरात 20 नवे जलमार्ग सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वाराणसी आणि पाटणा येथे जहाजबांधणी केंद्र उभारण्यात येणार असून, ओडिशामध्ये 22 नवे जलमार्ग सुरू केले जाणार आहेत.
गुंतवणूक वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न
देशात गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पायाभूत सुविधा, उद्योग आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्यावर सरकारचा भर आहे.
आत्मनिर्भर भारतसाठी 2 हजार कोटींचे टॉपअप
आत्मनिर्भर भारत योजनेसाठी 2 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी
- वस्त्रोद्योग आणि हातमाग उद्योगाला चालना
- सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद
- कंटेनर निर्मितीसाठी 10 हजार कोटी
- इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच्या निर्मितीसाठी 40 हजार कोटी
भारताला बायोफार्मा हब बनवण्याचे लक्ष्य
बायोफार्मा क्षेत्रासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत भारताला जागतिक बायोफार्मा हब बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे गंभीर आजारांवरील औषधांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
दुर्धर आजारांवरील औषधे स्वस्त होणार
कॅन्सर, एचआयव्ही, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांवरील औषधे स्वस्त करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच फार्माक्युटिकल अभ्यासासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
युवक आणि कृषी क्षेत्रावर विशेष भर
हा अर्थसंकल्प युवकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. आतापर्यंत 350 पेक्षा अधिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला असून, देशाची उत्पादन क्षमता वाढल्याचे त्यांनी नमूद केले.


