Praful Patel appointed NCP national president : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली असून, या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे विधान केले. गोयल यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही घोषणा राष्ट्रवादीकडून न होता भाजपच्या नेत्याकडून झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती नेमकी कुणी केली?
अजित पवार हयात असताना ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर थेट प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही नियुक्ती नेमकी कधी आणि कोणत्या प्रक्रियेत झाली, याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
शरद पवारांना दूर ठेवण्याचा डाव?
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आल्याची चर्चा सुरू असून, शरद पवार यांना राजकीय खेळातून दूर ठेवण्यासाठीच ही जबाबदारी पटेल यांच्याकडे सोपवण्यात आल्याचा दावा काही राजकीय वर्तुळात केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार अध्यक्षांकडे पक्षाचे सर्व अधिकार असतात, त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
सुनेत्रा पवारांच्या शपथेनंतर नवी खळबळ
शनिवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर काही नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची मागणी होत असतानाच प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षपदाची चर्चा समोर आल्याने राजकीय संभ्रम अधिकच वाढला आहे.
भाजप नेत्याकडून घोषणा का?
प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्तीची माहिती थेट भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून दिली जाणे, हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरतो आहे. त्यामुळे “राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत निर्णय भाजप नेत्यांना आधी कसे माहीत?” असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.


