Drunk Innova driver injures 15 people in Sangli : सांगली शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून, गणपती पेठ ते टिळक चौक या मार्गावर एका मद्यधुंद इनोव्हा चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत अनेक नागरिकांना जोरदार धडक दिली. या घटनेत १४ ते १५ जण जखमी झाले असून, त्यामध्ये चार वाहतूक पोलिसांचा समावेश आहे. चालकाची बेदरकार ड्रायव्हिंग करतानाची दृश्ये व्हिडिओत कैद झाली असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भरधाव वेगात गाडी चालवत चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धडक दिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर संतप्त जमावाने इनोव्हा कारची तोडफोड केली. तसेच दारूच्या नशेत असलेल्या चालकाला नागरिकांनी पकडून मारहाण केली. या मारहाणीत चालकही जखमी झाला आहे.
जखमी चालकासह एकूण १५ जणांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांवर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून, अपघातप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


