Sunetra Pawar : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी हाती घेतल्यानंतर आता पक्षाचं सर्वोच्च नेतृत्वही त्यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी हे पत्र लिहिले असून, त्यावर पक्षातील तब्बल ३० महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीच्या विविध सेल्सचे प्रमुख असून, एकमताने सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे पक्षातील विविध स्तरांवरील नेते आणि कार्यकर्त्यांचीही हीच भावना असल्याचे चित्र समोर येत आहे.
सध्या प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे असून, त्या पदाशिवाय अनेक धोरणात्मक आणि संघटनात्मक निर्णय घेणे कठीण ठरते.
अजित पवार यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाल्याने, लवकरात लवकर अध्यक्षपदाची नियुक्ती होणे आवश्यक असल्याचे मत पक्षात व्यक्त केले जात आहे. त्यामुळे हे पत्र प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होऊन सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अलीकडेच प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट करताना खुद्द पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. आमचा पक्ष लोकशाही मार्गाने चालतो आणि सर्वांशी चर्चा केल्यानंतरच अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा राष्ट्रवादीच्या आगामी निर्णयांकडे लागल्या आहेत.


