Budget 2026: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्राच्या आधुनिकतेसाठी जे स्वप्न पाहिले होते, त्याला आता केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून मोठे बळ मिळाले आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणण्याचा पुढाकार सर्वप्रथम अजितदादांनी घेतला होता, आता त्याच पावलावर पाऊल टाकत केंद्राने डिजिटल शेतीसाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. ‘अखेर अजित पवारांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे,’ अशा शब्दांत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या ‘एआय’ मॉडेलची देशपातळीवर दखल
राज्याच्या मागील अर्थसंकल्पात अजित पवारांनी कृषी क्षेत्रातील एआय वापरासाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. या धाडसी निर्णयामुळे महाराष्ट्र हे देशातील ‘एआय धोरण’ राबवणारे पहिले राज्य ठरले. याच धर्तीवर केंद्र सरकारनेही आता कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवले असून, महाराष्ट्राच्या ‘महा-विस्तार’ अॅपच्या धर्तीवर आता ‘भारत विस्तार’ हे बहुभाषिक एआय साधन देशभर कार्यान्वित होणार आहे.
शेती आणि ग्रामीण विकासासाठी तिजोरी खुली
यावेळच्या अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी सरकारने मोठी आर्थिक रसद पुरवली आहे:
- अॅग्री बिझनेस नेटवर्क: १६७ कोटी रुपये.
- सौर ऊर्जिकरण (उपसा सिंचन): २०७ कोटी रुपये.
- ग्रामीण परिवर्तन योजना (SMART): ६४६ कोटी रुपये.
- एकूण कृषी बजेट: सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत.
शेतकऱ्यांच्या हाती ‘डिजिटल’ शस्त्र
‘भारत विस्तार’ या नव्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना हवामान, पीक नियोजन आणि बाजारभावाची माहिती त्यांच्या स्थानिक भाषेत मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक थांबून निर्णय प्रक्रिया अधिक अचूक होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. शेतकऱ्याला तंत्रज्ञानाशी जोडणे हा अजितदादांचा ध्यास होता. केंद्र सरकारनेही आता याच मार्गाचा अवलंब केल्याने महाराष्ट्रातील शेती अधिक नफ्याची आणि सक्षम होईल, असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली या योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे.


