Parth Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षातील नेतृत्वाची नवी मांडणी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे.
राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
या रिक्त जागेवर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवारांचा राज्यसभेत प्रवेश करण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीला अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक होता. त्यांची टर्म 4 जुलै 2028 रोजी संपणार होती. मात्र, पक्षाकडून पार्थ पवार यांना उर्वरित दोन वर्षांची टर्म असलेल्या जागेऐवजी सहा वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या राज्यसभा जागेवर पाठवण्याचा विचार सुरू आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे.
मोर्चेबांधणी सुरू
राज्यसभेची जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असून, पार्थ पवार यांनी त्यासाठी अंतर्गत पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचंही समजत आहे.
पवार कुटुंबातील पुढील पिढी अधिक सक्रिय
अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय भूमिका निभावतील, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. याआधी बारामती परिसरात लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
आता बदललेल्या परिस्थितीत सुनेत्रा पवार राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व सांभाळतील तर पार्थ पवार राज्यसभेमार्फत संसदीय राजकारणात सक्रिय होतील. तसेच जय पवार दिल्ली पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे
पार्थ पवारांचा राजकीय प्रवास
पार्थ पवार यांनी याआधी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तरीही त्यानंतर पक्ष संघटन आणि प्रचारात ते सातत्याने सक्रिय राहिले आहेत.
शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसराला भेट दिली. याच ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. येथे त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवारांच्या संभाव्य स्मृतीस्थळासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले, मात्र मुंबईहून दिल्लीला जाण्याचा नियोजित दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


