पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने त्याच्याच जन्मदात्री आईला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पदाधिकाऱ्याने हा मात्र आरोप फेटाळला लावला असला, तरी त्याच्या आईने मात्र समोर येऊन आपबिती कथन करत मुलाचा खरा चेहरा समोर आणला आहे . मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष मारुती देशमुख यांच्यावर आईला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मारुती देशमुख यांनी आईला बेदम मारहाण केल्याने त्या महिलेच्या पाठीवर, हातावर तसेच मानेवरही मारहाणीचे व्रण दिसत आहे.
दरम्यान मारूती देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचे विश्वस्त पद देखील देशमुख यांच्याकडे असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आईला मारहाण केली, असा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र, आपण आईला मारल्याचा खोटा बनाव रचत माझा लहान भाऊ राजेंद्र देशमुखने गुन्हा दाखल केला आहे. पण आपण कोणतीही मारहाण केली नाही, असा दावा मारूती देशमुखांनी केला आहे. मला अजित पवार यांनी पद दिले म्हणून मला बदनाम करण्याचा हा डाव आहे. उलट मावळचे आमदार सुनील शेळकेंचा माझ्यावर विश्वास आहे, असा खुलासा मारुती देशमुखांनी केला. पण मुलाचे हे वक्तव्य ऐकल्यावर आई स्वत:पुढे आली आणि मुलाचे पितळ उघडे पाडत सर्व आपबिती कथन केली.
दरम्यान देशमुख यांची आई सात-आठ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या आहेत. त्यापूर्वी त्या पुण्यात राहणारा लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होत्या. परंतु, आता त्यांनी मूळगाव असलेल्या देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला आणि त्या तिथं राहायला आल्या. मात्र, आपली आई घरी राहायला आली हे मारुती देशमुख यांच्या कुटुंबाला आवडले नाही. आपली आई ही पुण्यात लहान भावाकडे पुन्हा परत जावी, म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु केला, असा आरोप लहान मुलगा राजेंद्र यांनी केला आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी आपल्या आईला बेदम मारहाण केली.


