पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात आता ३००० रुपये एकत्र येणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप या महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. दरम्यान, आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात महिलांना २१०० रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी २१०० रुपये होण्याची घोषणा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
फेब्रुवारीचा हप्ता अद्यापही का आला नाही?
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. यामागे दोन कारणे असल्याचे बोलले जात आहे. एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. दुसरे कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा न झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. कारण, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की,लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर सही करुन आलो आहे. आठ दिवसांत खात्यावर पैसे येतील. मात्र, अजून तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.


