जिमला जाताना किंवा चांगल्या आरोग्यासाठी आपल्यापैकी अनेकजण एनर्जी डिंक्स घेत असतील. यातून त्वरीत ऊर्जा मिळते. असे जरी असले तरी याचा वापर करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या पेयांमध्ये सामान्यतः साखर आणि कॅफिनचे प्रमाण जास्त असते, जे सेवन केल्यावर शरीराला ऊर्जावान वाटू शकते. मात्र, ही खरी ऊर्जा नसून शरीरावर ताणतणावाचा एक प्रकार आहे.
एनर्जी ड्रिंक्समधील कॅफिन, साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज एकत्रितपणे मूत्रपिंडात जळजळ वाढवतात आणि रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करण्याची त्यांची क्षमता बिघडवतात. एनर्जी ड्रिंक्स किडनी अर्थात मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण देतात आणि दीर्घकाळात मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाचे नुकसान करू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये, हे पेये अल्कोहोल आणि सोडापेक्षाही धोकादायक असतात.
अल्कोहोल शरीराला डिहायड्रेट करते आणि सोडा साखरेचा भार वाढवते, तर एनर्जी ड्रिंक्स हे दोन्हीचे मिश्रण आहे. यामुळे एकाच वेळी डिहायड्रेशन आणि रक्तातील साखर वाढते. मूत्रपिंडांना जास्त काम करावे लागते, ज्यामुळे फिल्टरिंग युनिट्स थकतात, जळजळ वाढते आणि नुकसान होण्याचा धोका वाढतो.
एनर्जी ड्रिंक्समध्ये हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप, कॅफिन, टॉरिन, कृत्रिम स्वीटनर्स आणि सोडियम बेंझोएट सारखी रसायने असतात. हे घटक मूत्रपिंडाच्या पेशींवर ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवतात. या रसायनांचे वारंवार फिल्टरिंग केल्याने सूक्ष्म जखम होते. ज्यामुळे हळूहळू दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो.


