Bajrang Sonawane On Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘अजितदादांचे विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच हवेत का फुटले? आणि विमानात ६ लोक असताना मृतदेह ५ च का सापडले?’ असे गंभीर सवाल करत सोनवणे यांनी या प्रकरणाला आता घातपाताचे वळण दिले आहे. दादांच्या प्रवासाचे ‘मिनिट-टू-मिनिट’ सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तपासावर संशयाची सुई: हवेतच ‘ब्लास्ट’ का झाला?
बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणातील तांत्रिक बाबींवर बोट ठेवत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विमानाचा अपघात झाला की ते हवेतच उडवण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘विमान जमिनीवर आदळण्यापूर्वीच त्याचा स्फोट कसा झाला?’ या तांत्रिक गुपिताची उकल व्हावी, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, विमानात ६ प्रवासी असल्याचे स्पष्ट असताना केवळ ५ मृतदेह हाती लागल्याने संशयाची सुई अधिक गडद झाली आहे. या पार्श्वभूमीवर पायलटची पार्श्वभूमी आणि अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘अजितदादा माझे राजकीय वडील’; स्मारकाची मोठी घोषणा
आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना सोनवणे म्हणाले की, १९९९ पासून दादांनी मला घडवले. ‘ते माझे केवळ नेते नव्हते, तर राजकीय वडील होते. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली असतानाच नियतीने त्यांना हिरावून नेले, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.’ दादांच्या स्मृती प्रित्यर्थ येडेश्वरी कारखाना परिसरात एक भव्य स्मारक उभारले जाईल आणि दादांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्याचे लोकार्पण केले जाईल, असा संकल्प त्यांनी यावेळी केला.
विमानातील शेवटच्या प्रवासाचे गुपित
बीड ते संभाजीनगर आणि तिथून पुण्याला जाताना बजरंग सोनवणे दादांच्या सोबत विमानात होते. त्यावेळच्या संवादाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘प्रवासात दादा माझ्याशी जे काही बोलले, ते मी आज जाहीर करणार नाही. मात्र, त्यांचे जे स्वप्न अपूर्ण राहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू.’ अजित पवारांच्या जाण्याने बीड जिल्ह्याचा ‘मोरल सपोर्ट’ संपला असल्याची भीती व्यक्त करत त्यांनी जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाबाबत चिंता व्यक्त केली.


