School Holiday : राज्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या भागांमध्ये मतदान होणार आहे, त्या ठिकाणी शाळा व काही शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत.
आज राज्यभरात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. पुणे, बारामती, पिंपरी-चिंचवड, सांगली, परभणी, धाराशिव यांसह अनेक भागांत मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, मुळशी, शिरूर, हवेली, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर आणि खेड या तालुक्यांत मतदान असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मतदार असलेल्या कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2 ते 3 तासांची विशेष सवलत देण्यात आली आहे.


