Pune ZP Election 2026 : पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान खळबळजनक घटना घडली आहे. खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या पतीवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी गटनेते शरद बुट्टे पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद बुट्टे हे खासगी कामानिमित्त घराबाहेर पडले असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची शक्यता असून त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असली तरी बारकाईने निरीक्षण सुरू आहे.
या घटनेनंतर आंबेठाण पाईट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून जुन्या वादातून किंवा राजकीय कारणातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


