मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमुळे पुन्हा एकदा लालपरीचे चाके थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात एसटी सेवा बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. यासाठी संघटनांनी राज्य सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळत असले तरी वेतनातील फरक तसेच मासिक भत्त्याची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. या मुद्द्यावरून कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून, महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेने सरकारकडे तात्काळ वाढीव रक्कम देण्याची मागणी केली आहे.
तीन दिवसांत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर एसटी बंद ठेवण्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे. राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेल्यास महाराष्ट्र बंदसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, लाखो प्रवाशांचे हाल होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसटी सेवा ठप्प झाल्यास ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


