Pune New Metro : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात लवकरच आणखी एक नवी मेट्रो सेवा सुरू होणार असून येत्या मे महिन्यात सुमारे 12 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच महा मेट्रोच्या पुणे मेट्रो भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी पुणे महानगर क्षेत्रात मेट्रोचे जाळे 200 किलोमीटरपर्यंत विस्तारण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली.
या विस्तारित मेट्रो नेटवर्कमध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए या क्षेत्रांचा समावेश असणार आहे. शहराच्या वाढत्या नागरीकरणाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगरविकास विभागाला संपूर्ण नेटवर्कचे नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सध्या पुण्यात सुमारे 33 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू असून दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात येणारा 23 किलोमीटरचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील मेट्रो प्रकल्पही अंतिम टप्प्यात आहे.
या प्रकल्पातील 12 किलोमीटरचा मार्ग मे महिन्यात सुरू होणार असून उर्वरित 11 किलोमीटरचा मार्ग जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या 33 किलोमीटरच्या मार्गासह एकूण मेट्रो नेटवर्क सुमारे 56 किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे.
याशिवाय आणखी 55 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे काम सुरू असून 80 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे महानगर क्षेत्रात एकूण 200 किलोमीटरपर्यंत मेट्रोचे जाळे उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.


