Ashok Kharat Case: नाशिकच्या बहुचर्चित ‘कॅप्टन’ अशोक खरात अत्याचार प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकर यांनी पद सोडले नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
चाकणकरांवर ‘पाद्यपूजना’चा गंभीर आरोप
करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “महिला आयोगाचे पद हे घटनात्मक आणि जबाबदारीचे आहे. मात्र, अध्यक्षा एका बलात्कारी व्यक्तीच्या घरी रांगोळी काढतात आणि दुसऱ्या नराधमाचे पाद्यपूजन करतात, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. महिलांच्या हितासाठी असलेल्या पदावर बसून अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांचे समर्थन करणे हे त्यांचे काम आहे का?”
मंत्रालयासमोर उपोषणाचे हत्यार
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे आता आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या सोमवारपासून मंत्रालयासमोर बेमुदत आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच जोपर्यंत चाकणकर राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी त्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत पत्रव्यवहार केला आहे, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
कंगना रणौत आणि प्रियंका गांधींवर भाष्य
यावेळी करुणा मुंडे यांनी अभिनेत्री आणि भाजप नेत्या कंगना रणौत यांच्यावरही निशाणा साधला. प्रियंका गांधींवर टीका करणाऱ्या कंगना यांना सुनावताना त्या म्हणाल्या, “भाजपमध्ये गेल्यावर तुम्ही साडी नेसून इतरांना चारित्र्यहीन म्हणत आहात? प्रियंका गांधींनी कधीही आपली ओढणी खाली उतरू दिली नाही, त्यांच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.”
धनंजय मुंडेंना पुन्हा आव्हान
नेहमीप्रमाणे करुणा मुंडे यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही तोफ डागली. “मी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री होऊ देणार नाही आणि त्यांचे आमदारपदही लवकरच जाणार आहे,” असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.


