Accident News : पिंपरी-चिंचवडमधील तरुणांच्या लेह-लडाख सहलीवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर या दुर्घटनेची माहिती त्यांच्या मित्रांना मोबाइलमधील ‘कार क्रॅश’ इमर्जन्सी अलर्टमुळे तात्काळ मिळाली.
रावेत येथील सार्थक तुपे याने सांगितले की, “अचानक मोबाइलवर अपघाताचा मेसेज आला आणि काळजाचा ठोका चुकला. लगेच मित्रांना फोन केला आणि अवघ्या काही मिनिटांत तिघांच्या मृत्यूची बातमी मिळाली.” या अपघातात कुणाल चोरडिया, मयुरेश पाडाळे आणि सिद्धांत आल्हाट यांचा मृत्यू झाला.
हे सर्व तरुण तीन कारमधून लेह-लडाख सहलीसाठी गेले होते. मात्र, राजस्थानमधील महामार्गावर त्यांच्या एका कारवरील नियंत्रण सुटल्याने ती भीषण अपघातग्रस्त झाली. मागील दोन कारमधील मित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कार पूर्णपणे चक्काचूर झाली होती.
या घटनेत आधुनिक तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली. मृत सिद्धांत आल्हाटच्या मोबाइलमध्ये सार्थक तुपे याचा नंबर ‘इमर्जन्सी कॉन्टॅक्ट’ म्हणून सेव्ह होता. अपघात होताच मोबाइलमधील सेन्सरने सकाळी १०:०५ वाजता ‘कार क्रॅश’चा ऑटोमॅटिक मेसेज पाठवला आणि दुर्घटनेची माहिती तात्काळ समोर आली.
विशेष म्हणजे, या सहलीला जाण्याचा आग्रह असूनही सार्थक तुपे काही कारणामुळे गेला नव्हता. तसेच, या गटातील आणखी एक तरुण अस्वस्थ वाटल्याने एक दिवस आधीच विमानाने घरी परतला होता. तो ज्या कारमध्ये प्रवास करत होता, त्याच कारचा अपघात झाल्याने तो थोडक्यात बचावला.
यापूर्वी हे तरुण कारगिलमध्ये बर्फवृष्टीमुळे काही दिवस अडकले होते. त्यावेळीही प्रशासनाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली होती. मात्र, परतीच्या प्रवासात झालेल्या या दुर्घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे.
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात शोककळा पसरली असून, एका आनंदाच्या सहलीचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


