Sanjay Raut : स्वयंघोषित तांत्रिक अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मोठा दावा करत खळबळ उडवली आहे. “जगात जशा ‘एपस्टीन फाईल्स’ गाजल्या, तशाच आता महाराष्ट्रात ‘खरात फाईल्स’ समोर येत आहेत,” असे ते म्हणाले.
या प्रकरणात अनेक बडे नेते, मंत्री आणि प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येत असल्याचा दावा करत राऊत म्हणाले की, “खरातच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह क्लिप्स सापडल्या असून त्यामुळे मंत्रीमंडळातील अनेक जण तणावाखाली आहेत. काहींना तर ICUमध्ये दाखल करावे लागले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणावर कारवाई सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राऊत यांनी अभिनंदनही केले. “गेल्या १५ दिवसांपासून गुप्तपणे तपास सुरू होता आणि आता ही कारवाई यशस्वी झाली,” असे ते म्हणाले. “राज्याला बदनाम करणाऱ्या या प्रकाराची मुळं उपटली जात असतील, तर ते स्वागतार्ह आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
राऊत यांनी पुढे आरोप केला की, “सध्याच्या मंत्रीमंडळातील काही मंत्री हे खरातचे नियमित ‘भक्त’ होते आणि त्याच्याकडे जाऊन विचित्र विधी करत होते.” त्यांनी यामध्ये सुमारे ९ मंत्र्यांचा सहभाग असल्याचा दावा केला.
या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत राऊत म्हणाले, “हा विषय फक्त महिला आयोगापुरता मर्यादित नाही. मंत्री आणि इतर मोठ्या नेत्यांचाही तपास झाला पाहिजे. चाकणकरांना तर जावंच लागेल; अन्यथा ते राज्याचं दुर्दैव ठरेल.”
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासातून पुढे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.


