Unseasonal Rain: रांजणगाव सांडस तसेच आलेगाव पागा, राक्षेवाडी व परिसरातील गावांमध्ये अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. कांदा काढून शेतात वाळवण्यासाठी ठेवलेला असताना पावसाची सर आल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्लास्टिकच्या आच्छादनासाठी धावपळ करत होते. मात्र, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा भिजला. आधीच कांद्याचे बाजारभाव घसरले असताना पावसामुळे दुहेरी संकट ओढवल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सध्या परिसरात गहू काढणीचे काम सुरू असताना जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी गव्हाची पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा- आळंदीत ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा कहर; नागरिक दहशतीत,चिमुरडीवर हल्ला
दरम्यान, अवकाळी पावसाचा फटका वीटभट्टी व्यवसायालाही बसला आहे. पावसामुळे कच्च्या विटा भिजल्याने वीटभट्टी चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप मदतीची रक्कम जमा झालेली नाही. त्यातच पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.


