Ashok kharat : भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. खरातचे परदेश दौरे आणि त्यामागील आर्थिक स्रोत आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले असून, त्याचे दक्षिण कोरिया येथील काही फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या फोटोंमध्ये खरात आपल्या कुटुंबासह परदेशात मौजमजा करताना दिसत आहे. एका बाजूला अध्यात्म आणि भक्तीचा आव आणणारा खरात, तर दुसऱ्या बाजूला परदेशात विलासी जीवन जगत असल्याचे या फोटोंमुळे स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे. यामुळे त्याच्या आर्थिक व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तपास यंत्रणांनी आता खरातच्या सर्व परदेश दौऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. त्याने आतापर्यंत किती वेळा विदेश दौरे केले, त्यासाठी लागलेला पैसा कुठून आला, याचा शोध घेतला जात आहे. त्याचा पासपोर्ट आणि ट्रॅव्हल हिस्ट्रीही तपासली जाणार असून, भोंदूगिरीतून कमावलेल्या पैशांचा वापर या दौऱ्यांसाठी झाला का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्या पक्षातील पदावरही गदा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या नव्या घडामोडींमुळे खरात प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


