Maharashtra Land Scam : महाराष्ट्रातील जमीन नोंदीतील गैरप्रकारांवर सरकारने मोठा हातोडा उचलला असून पुणे जिल्ह्यातील तब्बल १५२ महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याचे या अधिकाऱ्यांवर आरोप आहेत.
मंत्रालय स्तरावर या १५२ अधिकाऱ्यांची अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू असून, दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर लवकरच निलंबन, बदली आणि विभागीय चौकशीची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात काही तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांचाही समावेश असून, त्यांच्या विरोधातील तपशीलवार अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. अनियमिततेच्या तीव्रतेनुसार अधिकाऱ्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये १५ अधिकारी अतिगंभीर, ८२ गंभीर आणि ५५ मध्यम स्वरूपाच्या गैरप्रकारांमध्ये गुंतलेले असल्याचे समोर आले आहे.
लोकप्रतिनिधींकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत सरकारने चौकशी समिती नेमली होती. या समितीने गेल्या पाच वर्षांतील प्रकरणांचा सखोल तपास करून अहवाल सादर केला. तपासात काही अधिकाऱ्यांनी अधिकाराच्या मर्यादा ओलांडत जमीन नोंदीत बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मालकी हक्क, वारस नोंदी आणि क्षेत्रफळ बदलाशी संबंधित प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर अनियमितता उघडकीस आली आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


