Kolhapur News : कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी विद्यापीठच्या मुलींच्या वसतिगृहात २३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इशिता मधुसुदन सावंत असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती एम.ए. मानसशास्त्राच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
गुढीपाडव्याच्या सुटीनिमित्त तिच्या रूममधील इतर सहकारी गावी गेल्याने इशिता वसतिगृहातील खोलीत एकटीच होती. रात्री उशिरापर्यंत ती बाहेर न आल्याने शेजारील विद्यार्थिनींना संशय आला. त्यांनी आत पाहिले असता इशिताने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये “मिस यू डॅडी, मम्मी… मला माफ करा,” असे भावनिक शब्द लिहिलेले आहेत.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रेमप्रकरण किंवा मानसिक तणावाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सावंत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


