Ashok Kharat : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. लैंगिक शोषण आणि इतर गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला खरात पोलीस कोठडीतही आपली भोंदूगिरी थांबवायला तयार नसल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कोठडीत असताना खरातने पोलिसांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत “मी तुमचं भविष्य सांगतो, तुम्हाला काय होणार हे मला माहीत आहे,” असे म्हणत ‘भविष्यवाणी’चा आधार घेत संवाद साधला. काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी सांगत त्याने भीती आणि कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते.
मात्र, नाशिक पोलीस त्याच्या या प्रकाराला अजिबात बळी पडले नाहीत. उलट, कायद्यापुढे कोणताही प्रभाव चालत नाही, हे दाखवत पोलिसांनी त्याला कडक उत्तर दिले. “कायद्याचा बालेकिल्ला” काय असतो, याची जाणीवच त्याला करून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी करत आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याचा सहकारी नीरज जाधव यालाही समोरासमोर बसवून विचारपूस करण्यात आली, ज्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समजते.
तपासादरम्यान नीरज जाधवच्या कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये ३० ते ४० महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या माध्यमातून महिलांना खरातकडे आणले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
एकूणच, या प्रकरणात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असून तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


