Weather Temprature Update : राज्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ सुरू असून एका बाजूला तापमानात वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे.
कोकणातील ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार असून यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र उन्हाचा चटका अधिक तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
काल अकोला येथे देशातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर निफाड येथे किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस इतके होते. त्यामुळे राज्यात तापमानातील तफावत स्पष्ट दिसून येत आहे.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १७ ते २३ मार्चदरम्यान सुमारे ७६ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून शेकडो शेतकरी संकटात सापडले आहेत. गहू, हरभरा, उडीद, जवस यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहेत.
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक नुकसानाचा अंदाज असून अंतिम पंचनाम्यानंतर हा आकडा वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या मदतीकडे लागले आहे.


