आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देताना अनेक काळजी घेत असतो. त्यात नियमित फळे खाणारेही आपल्यापैकी अनेकजण असतील. मात्र, याच फळातून रक्तातील साखर वाढू शकते. प्रत्येकाला निरोगी जीवनशैली हवी असते. योग्य वेळी योग्य अन्न खाणे महत्त्वाचे आहे. रात्रीच्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो.
आपल्यापैकी अनेक लोक रात्री फळे खाणे आरोग्यदायी मानतात, परंतु काही फळे हानिकारक असू शकतात. रात्री शरीराची पचनक्रिया मंदावते आणि काही फळांमधील साखर, आम्ल किंवा फायबर झोप आणि पचनावर परिणाम करू शकतात. काही फळांच्या नियमित सेवनाने वजन वाढणे, आम्लपित्त, झोपेत अडथळा आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. मात्र, रात्री संत्री खाल्ल्याने त्यांच्या आम्लधर्मी परिणामांमुळे छातीत जळजळ, छातीत दुखणे आणि ॲसिड रिफ्लक्सचा धोका वाढू शकतो. पोटाच्या समस्या किंवा अल्सरने त्रस्त असलेल्यांसाठी हे विशेषतः हानिकारक ठरू शकते.
आंबा देखील रात्री खाऊ नये. आंबे गोड आणि पौष्टिक असतात, पण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. रात्री आंबे खाल्ल्याने रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होऊ शकते. यामुळे मधुमेहींसाठी धोका वाढतो आणि दीर्घकाळात वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. तसेच सफरचंदही रात्री खाणे टाळावे.
कारण, सफरचंदात फायबरचे प्रमाण जास्त असते. रात्री सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय, सफरचंदातील साखरेचे प्रमाण रात्रभर शरीरात साठू शकते.


